प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : मातोश्री तानुबाई दगडु खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथे सहायक शिक्षिका म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यास सुरुवात करून MTDK शैक्षणिक संकुल, मिरजच्या मुख्याध्यापिका पदापर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या सौ. संगीता युवराज पाटील यांची ‘अभिनव सन्मान पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. मिरजेच्या अभिनव संघटनेच्या वतीने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
सौ. पाटील यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या या कार्यामुळे MTDK शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळाले असून, मिरज व पंचक्रोशीत संस्थेचा नावलौकिक वाढण्यास हातभार लागला आहे.
सहायक शिक्षिका ते मुख्याध्यापिका हा त्यांचा प्रवास मेहनत, निष्ठा, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक समर्पणाचे उदाहरण मानला जात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत झालेली ‘अभिनव सन्मान पुरस्कारासाठी’ निवड हा त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पुरस्कारामुळे सौ. संगीता युवराज पाटील यांच्या कार्याचा सन्मान होण्याबरोबरच MTDK परिवारातील शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या योगदानाचाही गौरव होत असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या