प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. १७७९ (शके १७०१) मध्ये तासगाव येथे स्थापन केलेल्या ऐतिहासिक सिद्धिविनायक मंदिराचा २४७ वा अखंडित वार्षिक भाद्रपद उत्सव यंदा दि. १२ सप्टेंबरपासून भक्तिभावात सुरू होणार आहे.या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात धार्मिक वातावरण निर्मितीसाठी विविध धार्मिक अनुष्ठानांना प्रारंभ झाला आहे.परंपरेनुसार भाद्रपद उत्सवाला भावभक्तिपोषक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने श्रावण शुद्ध चतुर्थी, दि. १६ ऑगस्ट रोजी पाचही पंचायतन देवतांच्या एक मास दैनिक अनुष्ठानास प्रारंभ करण्यात आला.
मंदिराचे विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन व राहुल राजेंद्र पटवर्धन यांनी वेदमूर्ती पं. अनंतशास्त्री जोशी यांच्या आवाहनानुसार ब्रह्मवृंदास शास्त्रविधिपूर्वक निर्देशन केले. मंदिरातील तसेच पटवर्धन राजवाड्यातील देवतांच्या मंत्र, ऋचा, सूक्ते आदींचे विधिवत पठण या अनुष्ठानादरम्यान करण्यात येणार आहे.या धार्मिक अनुष्ठानासाठी पं. दीपक पां. जोशी, पं. सौरभ दी. जोशी, पं. अथर्व अ. जोशी, पं. प्रज्ज्वल गोसावी, पं. अजित कुलकर्णी, पं. मल्हारी कुलकर्णी आणि पं. विजय कुलकर्णी या ब्रह्मवृंदाचा सहभाग आहे.
दरम्यान, १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २४७व्या भाद्रपद उत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी मंदिराचे सरव्यवस्थापक पवनसिंह कुडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, समीर यादव, ओम् काकडे, रंजित चव्हाण, प्रताप पवार, दिलीप पवार, गजानन घाटगे आणि प्रतीक गोसावी यांचे सहकार्य लाभत आहे.
तासगावच्या धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणारा हा अखंडित उत्सव यंदाही भक्तिभाव, शास्त्रोक्त विधी आणि पारंपरिक धार्मिक वातावरणात साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या