सांगली प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या पर्वाच्या पूर्वसंध्येला सांगली- मिरज- कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महापालिकेच्या बालवाडीतील चिमुकल्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शाळा क्रमांक १, सांगली येथे आयोजित कार्यक्रमात बालवाडीतील १,२११ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २,४२२ शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. बानु मुसा जमादार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. महापालिकेच्या जेंडर बजेटमधील ५ टक्के राखीव निधीतून (सन २०२६-२७) हे गणवेश खरेदी करण्यात आले आहेत.
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसह सर्व बालकांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यामध्ये एकसमानतेची भावना निर्माण व्हावी तसेच शाळेबद्दल आपुलकी आणि आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या गणवेश वाटप कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. बानु मुसा जमादार यांच्यासह समितीच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये श्रीमती विद्या बाबासाहेब नलवडे, सौ. योगिता परशुराम राठोड, सौ. मीनाक्षी सदाशिव पाटील, सौ. रोहिणी सत्यजीत पाटील, सौ. लक्ष्मी रघुनाथ सरगर, सौ. रईसा वसिम शिकलगार, सौ. वैशाली राजू गवळी, सौ. मुब्बशिरिन इजहार बागवान, सौ. बिलकिस बानुसादिक, सौ. अश्विनी नंदकुमार कोळेकर, सौ. अंजली अजित जाधव, सौ. अश्विनी चेतन कदम, सौ. नसिमा गैबिसो नाईक आणि सौ. रेश्मा जुबेर चौधरी यांचा समावेश होता.
यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त (महिला व बालकल्याण) विद्या पाटील, महिला व बालविकास अधिकारी बाबासाहेब माळी, शिक्षण विभागाचे समन्वयक सौदंत्ते सर, महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन गणवेशामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन गणवेश मिळाल्याने बालवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. महापालिकेच्या माध्यमातून बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, गणवेश वाटपाचा हा उपक्रम त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या उपक्रमामुळे महापालिकेच्या बालवाडी शिक्षणाच्या प्रवाहाला अधिक बळ मिळून विद्यार्थ्यांमध्ये समानता, आत्मविश्वास आणि शाळेविषयीची आपुलकी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालकल्याण समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या