सांगली: सांगली मिरज अॅण्ड कुपवाड सिटी कॉर्पोरेशन सॅलरी अर्नर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगलीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवारी (दि. १६ ऑगस्ट २०२६) सकाळी ११:०० वाजता महानगरपालिका मुख्यालयीन पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात (दुसरा मजला) अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन श्री. माणिक सज्जन गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांसाठी १२ टक्के डिव्हीडंड (लाभांश) जाहीर करण्यात आला असून, संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्यात आला.
या वार्षिक सभेचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मा. महापौर श्री. धीरज सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते श्री. मंगेश चव्हाण यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सुरू करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्रीमती उषा रमेश नरळे, सर्व आदरणीय संचालक मंडळ, तज्ञ संचालक, संस्थेचे सचिव तथा अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते.
सभेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून संस्था सतत 'अ' वर्गात कार्यरत आहे:
* संस्थेची एकूण सभासद संख्या ४८९ असून ठेवींची एकूण रक्कम रु. १७,७०,००,१६६/- इतकी झाली आहे.
* संचालक मंडळाने सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन शेअर्सवर १२% लाभांश जाहीर केला आहे.
* संस्थेच्या ठेवीमध्ये रु. २,४९,७७,०६६/- ने तर कर्ज वितरणात रु. २,७०,९६,१२६/- ने वाढ झाली असून कर्जावरील व्याजदर ११% ठेवण्यात आला आहे.
तसेच सभासद संजीवनी निधीतून मयत सभासदांच्या वारसांना रु. ९,५८,०००/- सन्मानपूर्वक अर्थसहाय्य देण्यात आले आहे. अहवाल सालात सभासदांना वेळीच कर्जपुरवठा व्हावा म्हणून १३ सभा घेण्यात आल्या.
हनुमान नगर येथे अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, क्रीडांगण व अभ्यासिका उभारण्यासाठी ५० लाखांचा निधी:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री. नकुल जकाते यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना तज्ञ संचालक श्री. नितीन कृष्णाजी शिंदे यांनी, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हनुमान नगर येथील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, क्रीडांगण, अभ्यासिका तसेच मंगल कार्यालय उभारण्यात यावे, अशी मागणी केली. यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या प्रयोजनाकरिता यापूर्वीच मंजुरी दिली असून, स्थायी समिती सभापतींनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या कामासाठी सोसायटीच्या वतीने ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांनी, या प्रस्तावाला सर्व महापालिका पदाधिकारी व सदस्यांकडून एकमताने मंजुरी मिळवून देऊ, तसेच अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना सर्वोत्कृष्ट क्रीडा, अभ्यासिका व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी बोलताना महापौरांनी स्पष्ट केले की, महापालिका क्षेत्रातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, आणि कुपवाड येथील कै. मदनभाऊ पाटील स्टेडियम या प्रमुख क्रीडांगणांचा देखील विकास करण्यात येणार आहे. विशेषतः, छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथील महापालिकेचा करार संपुष्टात आला असून, या बाबतचा तांत्रिक तिढा सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
सभासदांच्या ज्या मुला-मुलींनी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर श्री. धीरज सूर्यवंशी ,विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे वैधानिक लेखापरक्षण मा. श्री. अमोल भिलवडीकर (सर्टिफाईड ऑडीटर) यांनी केले असून त्यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. सभेच्या शेवटी सर्व सभासद व संचालक मंडळाच्या उपस्थितीत विषय पत्रिकेवरील विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेने उपस्थितांचे आभार मानून सांगता करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या