मिरज दि. १५ : स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकिय गुलामगिरीतून मुक्ती नव्हे तर प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासासाठी जबाबदारीने कर्तव्य करणे होय. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्याची आठवण ठेवून भारतीयत्वाची भावना जोपासा.. स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये जपा.. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधीलकी अंगिकारावी असे प्रतिपादन संस्थापक चेअरमन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले.त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट (जीपीएमटी)च्या संकुलात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत वातावरणात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकावून व राष्ट्रगीताने करण्यात आली. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रनिर्मिती आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या वक्तृत्वातून देशप्रेमाची भावना प्रकर्षाने जाणवली. विविध देशभक्तिपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक व देशभक्तिपर वेशभूषा, जोशपूर्ण सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विविध विभागांचे प्राचार्य व समन्वयक यांनीही उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण जीपीएमटी संकुलात “विविधतेत एकता, राष्ट्र प्रथम” या भावनेचा प्रत्यय आला. पालकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि सादरीकरणाचे कौतुक केले.
यावेळी संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागप्रमुख, प्राचार्य, समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत अधिक प्रज्वलित करणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या