प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिवसेनेत उभी फूट पडण्याला आणि ठाकरेंच्या सेनेची पुरती वाट लागण्याला सर्वाधिक कारणीभूत असलेल्या खासदार संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. आपल्या राजकीय शैलीतून आणि ग्रामविकासाच्या कृती कार्यक्रमांतून स्वतःला सिद्ध करत असलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बेताल टीका करणाऱ्या राऊतांवर मानसिक उपचाराची गरज आहे. त्याची मोफत सोय आम्ही मिरजेतील प्रसिद्ध मानसोपचार रुग्णालयात करू, असा प्रतिहल्ला भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत संजय राऊत यांनी दोन वेळा जयकुमार गोरे यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्याला गोरे यांनी अत्यंत संयमाने ‘मी राऊत यांना ओळखत नाही, कोण संजय राऊत’, अशा शब्दांत दुर्लक्षित केले. त्यानंतरही राऊतांकडून अर्वाच्च भाषेचा वापर केला जातोय. त्याबद्दल श्री. पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवतो असे सांगता-सांगता संजय राऊत स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत का? त्यामुळे ‘ठाकरी शैली’त टीका करावी, असा मोह त्यांना होत असावा. परंतू, त्यांची पात्रता काय, ते बोलतात काय, याचे भान त्यांना राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाची सध्याची जी काही परिस्थिती आहे, त्याचे खापर त्यांच्यावर फुटले आहे आणि ते वास्तव आहे. त्यामुळे आता तोंड लपवायला जागा नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यातच २०१९ च्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळात त्यांनी केलेल्या कर्तबगारीचे काही किस्से आता उघड होत असलेल्या त्यांना काय करावे कळेना झाले आहे. ही बिकट मानसिक अवस्था आहे. अशावेळी उपचारांचीच आवश्यकता असते. अन्यथा, हा आजार बळावत जाण्याची भिती असते. राऊतांनी वेळीच स्वतःवर उपचार करून घ्यावेत.
त्यांनी म्हटले आहे, की जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीने स्वतःला राजकारणात सिद्ध केले आहे, ती सोपी गोष्ट नाही. त्यांची वाटचाल प्रचंड संघर्षातून झाली आहे. अनेक आव्हाने पेलत ते आले आहेत. ग्रामविकास मंत्रालयासारखे खाते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळले आहे. ग्रामीण महाराष्ट्राला या राज्याचा कणा समजले जाते. तो मजबूत करण्याचे काम जयकुमार गोरे करत आहेत. गावकुसातील सामान्यातील सामान्य माणसाला विकास प्रक्रियेत बळ देणाऱ्या योजना ते राबवत आहेत. त्यांनी राऊतांसारख्या फाटक्या तोंडाच्या माणसाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिलेला नाही. तरीही, राऊत बडबडत असतील तर जयकुमार गोरे यांचे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते सहन करणार नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या