सांगली : जिल्हा परिषद सांगलीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. मोहन संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध दि. १६ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद सदस्य श्री. सुनील रावसाहेब पवार यांना सांगली येथील प्रसिद्ध वकील ॲड. अभिषेक खोत यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटिशीनुसार, संबंधित सभेत शिक्षणाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस दस्तऐवज, चौकशीचा निष्कर्ष अथवा सक्षम प्राधिकरणाचा आदेश सभेत सादर करण्यात आला नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आल्याने त्यांना तत्काळ स्पष्टीकरण देण्याची संधीही मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, दि. ०८ ऑगस्ट २०२६ रोजी एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये संबंधित आरोपांबाबत कथित स्वरूपाची बातमी/मजकूर प्रसारित करण्यात आल्याचे नोटिशीत नमूद असून, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या सामाजिक, व्यावसायिक व प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
नोटिशीत भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील मानहानीसंबंधी तरतुदी तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील संबंधित तरतुदींचा आधार घेण्यात आला असून, आरोप मागे घेऊन लेखी व बिनशर्त माफी मागावी, संबंधित मजकूर/बातमी काढून टाकावी व त्याबाबत स्पष्ट खुलासा प्रसिद्ध करावा तसेच नुकसानभरपाई म्हणून २ कोटी रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा फौजदारी मानहानीची तक्रार, दिवाणी दावा व प्रतिबंधात्मक आदेशासह उपलब्ध कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या