कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्ता आणि सुधारणा हे राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. प्रा. किसनराव कुराडे हे समाजाला दिशा दाखविणारे दीपस्तंभ आहेत. साहित्यिकांनी परिवर्तन आणि प्रबोधनाचे कार्य साहित्यातून केले पाहिजे. त्यांनी साहित्यातून मांडलेले विचार समाजासाठी दिशादर्शक असतात. सत्याचा आणि नैतिकतेचा आवाज संवेदनशील साहित्यिकांनी बुलंद केला पाहिजे. त्यांच्या निर्मितीच्या मागे वेदना, तळमळ असावी. त्यातून चांगले विचार समाजात प्रेरण्याची ताकद निर्माण होते. सत्याचा आणि नैतिकतेचा आवाज बनण्यासाठी साहित्यिकांनी निर्भय होऊन लिहिणे गरजेचे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.
ते ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. किसनराव कुराडे यांच्या साहित्य, शिक्षण, समाजप्रबोधन आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार व त्यांच्या निवडक साहित्यावर आधारित निर्मिती प्रकाशन प्रकाशित डॉ. कपिल राजहंस आणि डॉ. शोभा चाळके-म्हमाने संपादित 'प्रबोधक प्रा. किसनराव कुराडे निवडक साहित्य (खंड-1)' या 1 हजार पानांच्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणाले, प्रा. किसनराव कुराडे स्त्रीवादी लेखक आहेत. साहित्यिकांनी मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून आपली लेखणी चालवणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती स्त्रीसत्ताक असून स्त्रियांना सन्मानाने वागण्याची नवी संस्कृती आपण तयार केली पाहिजे.
यावेळी साहित्यिक दंगलकार नितीन चंदनशिवे म्हणाले, आपले साहित्य येणाऱ्या पिढीला शहाणपण शिकवणारे असले पाहिजे. सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या साहित्यातून नवे सुचण्याची प्रक्रिया सर्वोच्च आनंद देणारी असते. आम्ही मात्र डावा उजवा करीत आहोत. अशा या परिस्थितीत साहित्यिकांनी मानव मुक्तीसाठी प्रेरक ठरेल असे साहित्य लिहिले पाहिजे.
प्रा. किसनराव कुराडे यांनी ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रकाशक अनिल म्हमाने, ग्रंथाच्या संपादिका डॉ. शोभा चाळके, सुरेश केसरकर, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली.
क्रांतीदेवी कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, आलोक जत्राटकर, शिवाजीराव परुळेकर, सुनिल जाधव, अनिल कलकुटकी, गंगाधर म्हमाने, डॉ. दिनकर पाटील, सिकंदर तामगावे, लाला नाईक, मच्छिंद्र कांबळे, संजयकुमार अर्दाळकर, अशोक मानकर, गडहिंग्लज नगरपालिकेच्या नगरसेविका प्रा. बिनादेवी कुराडे, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, साहित्यिक कमल कुरळे, प्रा. आनंद नाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत सुरेश केसरकर, प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले. आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या