प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : पोदार प्रेप, सांगली येथे ‘लिटरसी आणि न्यूमरसी मेला २०२६’ या विशेष शैक्षणिक उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. ‘आवाजातून शिका, खेळातून मोजा!’ या अभिनव संकल्पनेवर आधारित या मेळ्यात विद्यार्थी आणि पालकांनी विविध मनोरंजक व ज्ञानवर्धक उपक्रमांचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नोंदणी डेस्कवर प्रत्येक कुटुंबाला मोफत ‘लिटरसी एक्सप्लोरर’ आणि ‘न्यूमरसी एक्सप्लोरर’ पास देण्यात आले. या पासच्या माध्यमातून मुलांना अक्षर, शब्द, ध्वनी, संख्या आणि गणिती संकल्पना खेळाच्या माध्यमातून आत्मसात करण्याची संधी मिळाली.
मेळ्यात ‘लेटर पीक-अ-बु’, ‘साउंड सफारी’, ‘बिल्ड अ वर्ड’, ‘हॉपस्कॉच’, ‘पॅटर्न परेड’, ‘अॅडिशन विथ डाइस’ यांसारख्या विविध मजेदार आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये मुलांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘लर्निंग थ्रू प्ले’ या संकल्पनेची प्रभावी अनुभूती पालकांना या मेळ्याच्या माध्यमातून मिळाली. खेळ, कृती आणि आनंदाच्या माध्यमातून मुलांचा भाषिक व गणितीय विकास कसा साधता येतो, हे विविध उपक्रमांमधून अनुभवता आले. त्यामुळे शिक्षण हे केवळ पुस्तके आणि वर्गापुरते मर्यादित नसून ते आनंददायी आणि अनुभवाधारितही असू शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या मेळ्याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक पालकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी पालक व मुलांनी सेल्फी घेत आनंद व्यक्त केला तसेच आपल्या उत्स्फूर्त अभिप्रायातून कार्यक्रमाचे कौतुक केले.
‘शिकणं खरंच खूप मजेशीर झालं!’ या आनंददायी भावनेने मेळ्याची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या