सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात विटा शहराजवळील रेवणसिद्ध घाटात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे १५ ते १६ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विट्याहून जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढ्याकडे जाणारी दुसरी एसटी बस रेवणसिद्ध घाटातील एका वळणावर समोरासमोर आली. यावेळी दोन्ही बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, एका बसचा पुढील भाग दुसऱ्या बसच्या मध्यभागापर्यंत घासत गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या तसेच गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, प्रशासन आणि एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक आमदार सुहास बाबर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघातामुळे रेवणसिद्ध घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघातग्रस्त दोन्ही बस रस्त्यावर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
विटा पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास करण्यात येत आहे. घाटातील वळणावर वाहनांचा वेग, चालकाचे नियंत्रण, समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज चुकणे आदी शक्यतांचा तपास केला जात आहे.
अपघातातील मृतांची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाहीत. जखमी आणि मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतरच मृत आणि जखमींची निश्चित संख्या स्पष्ट होणार आहे.
रेवणसिद्ध घाटातील या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या