सांगली, दि. १४ : स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्षाच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज भव्य सायकल आणि ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा ध्वजांनी सजलेल्या सायकली आणि ई-बाईकमुळे या रॅलीने सांगली शहरातील वातावरण देशभक्तीमय केले.
सकाळी ७ वाजता विश्रामबाग चौक येथून रॅलीचा दिमाखदार प्रारंभ झाला. विश्रामबाग चौक, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राममंदिर, काँग्रेस भवन मार्गे रॅली स्टेशन चौक येथे पोहोचून संपन्न झाली. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत तसेच सायकलींवर तिरंगा लावून देशभक्तीचा उत्स्फूर्त संदेश दिला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे, हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता.
या रॅलीतून केवळ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यापुरता संदेश न देता ‘निरोगी भारत, समृद्ध भारत’ हा संदेशही देण्यात आला. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देतानाच नागरिकांनी नियमित सायकल चालवून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
महानगरपालिकेच्या विविध विभागप्रमुखांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे संपूर्ण मार्गावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहभागी सायकलप्रेमी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्यासोबतच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या