प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली : शेतीला समृद्धीकडे नेण्याबरोबरच सेंद्रिय शेतीला व्यापक चालना देण्याच्या उद्देशाने संवाद फोरम आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य सेंद्रिय शेती परिषद २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी भोसे येथील एम. डी. जाधव कॉलेज येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही परिषद होणार आहे.
सेंद्रिय शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, बदलत्या कृषी पद्धती, शेतीमालाची गुणवत्ता तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने याबाबत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने ही परिषद शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते होणार असून जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच ATMAचे अभयकुमार चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर आणि अन्न व औषध प्रशासकीय अधिकारी निलेश मसारे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शाश्वत व समृद्ध शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच कृषीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या परिषदेचे निमंत्रक संवाद परिवाराचे डॉ. रविकांत पाटील, सर्जेराव पाटील, सोहेल गौंडाजे, सदाशिव मगदूम आणि मीनाक्षी कोळी आहेत.
‘कृषी मूलं जगत् सर्वम्’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेतून सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती होऊन शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीच्या दिशेने नवी दिशा मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या