सांगली : अहिल्यानगर येथे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगलीत मारुती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘भगवा टिळा लावणे हा गुन्हा आहे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलकांनी कपाळावर भगवा टिळा लावून घटनेचा निषेध केला.
या घटनेमुळे हिंदू समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, धर्माच्या आधारावर हिंसाचार करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी आंदोलनाला संबोधित करताना घटनेचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करण्यात आला. मुंबईतही धर्माच्या आधारावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्या हत्येची घटना समोर आली आहे. धर्माच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांविरोधात शासनाने कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली पाहिजे.
धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करावी आणि प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात घेऊन दोषींना तातडीने शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
यावेळी काही आंदोलकांनी आरोपींच्या एन्काऊंटरची मागणी केली. तसेच आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
“हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगव्या टिळ्यावरून जर एखाद्याचा जीव घेतला जात असेल, तर अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे,” अशी संतप्त भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या निषेध आंदोलनास हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व हिंदूवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, पै. प्रदीप निकम, भूषण गुरव, अनिरुद्ध कुंभार, दीपक तिवले, गजानन माने, अनिकेत अंम्बरूळे, यश पाटील, प्रेम देसाई, नारायण हांडे, संजय तांदळे, संतोष लोहार, सचिन देसाई, प्रकाश निकम, पै. श्रावण पडळकर, पै. गोपाळ पवार, अमर चित्रे, बाळासाहेब बेलवलकर, पंडितराव बोराडे, विनायक ठोंबरे, सुमित शिंगे, पवन चौगुले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या