प्रतिष्ठा न्यूज
आरवडे प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या ‘आदर्श शाळा पुरस्कार’चा पहिलाच मान आरवडे येथील श्री सिद्धनाथ हायस्कूलने मिळविला. या उल्लेखनीय यशाबद्दल आरवडे ग्रामस्थांच्या वतीने शाळेचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
शाळेने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रम, विविध सहशालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार आरवडेच्या श्री सिद्धनाथ हायस्कूलला मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गौरव सोहळ्यास आरवडे गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आरवडे येथील शाळेत संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महाविद्यालय, तासगाव येथील प्रशिक्षणार्थी अभिरूप शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षिकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त करताना, “हा पुरस्कार केवळ शाळेचा नसून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे. ग्रामस्थांनी केलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि उपक्रमांची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे सांगितले.
आरवडे गावाला मिळालेला हा शैक्षणिक सन्मान गावाच्या लौकिकात भर घालणारा असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि शिक्षकांच्या कार्याला मिळालेली ही मोठी पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या