सांगली : सैनिकांचे कल्याण, मनोधैर्य आणि प्रशिक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात होय, असे गौरवोद्गार मा. सरदार रामचंद्र अजितसिंग पाटणकर उर्फ बाळ पाटणकर यांनी काढले.
शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कला चावडी’ या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी पाटणकर यांनी लेफ्ट. जन. थोरात यांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सैनिकी कारकिर्दीवर प्रकाश टाकला. भारतीय लष्करातील अत्यंत धाडसी, कर्तव्यनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेले सेनापती म्हणून थोरात यांचा उल्लेख केला जातो. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेला हा सुपुत्र युद्धभूमीवर जितका ठाम होता, तितकाच धोरणात्मक निर्णयांच्या टेबलवरही प्रभावी होता, असे त्यांनी सांगितले.
थोरात यांच्या १९२६ सालच्या सँडहर्स्ट कमिशनपासून दुसऱ्या महायुद्धातील ‘डीएसओ’ किताब, कोरियन युद्धातील युद्धकैद्यांच्या व्यवस्थापनातील भूमिका तसेच १९६१ मध्ये त्यांनी मांडलेल्या संरक्षण रेषेविषयक धोरणाची माहिती पाटणकर यांनी दिली. लेफ्ट. जन. थोरात यांचे ‘फ्रॉम रेव्हेली टू रिट्रीट’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून विद्यार्थ्यांनी ते आवर्जून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कर्नल संकेत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतात थोरात यांची युद्धविषयक दूरदृष्टी, विविध लष्करी योजना, ध्येयधोरणे, कोरियन युद्धातील कामगिरी तसेच बर्मा मोहिमेतील योगदान याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक गौतम पाटील यांनी केले. अतिथी परिचय उपसंचालक डी. एस. माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हर्षा बागल यांनी केले.
१६ ऑगस्टपर्यंत प्रदर्शन खुले
लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे ‘कला चावडी’ हे प्रदर्शन बुधवार, १२ ऑगस्ट ते रविवार, १६ ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक गौतम पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या