प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष बाजारपेठेत अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते बाजार समितीने दिलेल्या लेखी निर्णयानंतरही बेदाणा सौद्यांदरम्यान मालाची उधळण सुरूच असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केला आहे.बेदाणा सौद्यांमध्ये होणारी उधळण,मालाची निष्काळजीपणे हाताळणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागणारा आर्थिक फटका थांबविण्यासाठी मनसेने यापूर्वी आक्रमक आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याबाबत लेखी स्वरूपात माहिती दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,अशी अपेक्षा निर्माण झाली होती.मात्र, निर्णय घेऊन काही दिवस उलटताच बाजारपेठेतील परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याचा दावा मनसेने केला आहे.निर्णय फक्त कागदावरच ठेवायचे असतील तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा? असा थेट सवाल अमोल काळे यांनी केला आहे. आमदारांच्या हस्ते लेखी निर्णय देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर बाजार समितीच्या आदेशाला नेमके कोण जुमानत नाही? असा सवाल उपस्थित करत बाजार समितीच्या कारभारावर त्यांनी निशाणा साधला.बेदाणा उत्पादक शेतकरी वर्षभर कष्ट करून उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्च करून तयार केलेला माल बाजारपेठेत आणल्यानंतर सौद्यादरम्यान होणारी उधळण ही थेट शेतकऱ्यांच्या खिशावर परिणाम करणारी बाब आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची काटेकोरपणे हाताळणी होणे, मालाची नासाडी टाळणे आणि बाजार समितीने घालून दिलेल्या नियमांचे व्यापारी व संबंधित घटकांनी पालन करणे आवश्यक असल्याचे काळे यांनी सांगितले.
बाजार समितीचे सभापती, संचालक,अडतदार आणि व्यापारी यांनी शेतकरी हिताचे निर्णय केवळ कागदावर न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. “शेतकरी हिताचे निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर बाजार समितीचा कारभार नेमका कोणाच्या हितासाठी चालतो?”असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
आमदारांचा अपमान;आता दांडकं हातात घेणार!
“शेतकऱ्यांच्या मालाची उधळण थांबविण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी सभापतींच्या माध्यमातून लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर मनसेचे उपोषण सोडविण्यात आले. तरीही बेदाण्याची उधळण सुरूच असेल, तर हा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर आमदारांचा आणि बाजार समितीच्या निर्णयाचा देखील अपमान आहे,” असा संतप्त इशारा अमोल काळे यांनी दिला.
“आमदारांचेही व्यापारी ऐकत नसतील,तर आता आम्ही दांडकं हातात घेणार,”अशी आक्रमक भूमिका काळे यांनी घेतल्याने बेदाणा बाजारातील हा मुद्दा पुन्हा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीने तातडीने निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून बेदाणा उधळणीला आळा घालावा, अन्यथा मनसे पुन्हा आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या मालाची उधळण थांबणार की बाजार समितीचे आदेश पुन्हा कागदावरच राहणार, याकडे आता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या