सांगली, दि. २ : जय भीम क्रांती सेना, सांगली जिल्ह्याच्या वतीने साहित्यसम्राट, लोकशाहीर व सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शांतीकिरण (मद्रासी कॉलनी), सांगली येथे भव्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या सभेचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ दंगलकार कवी नितीन चंदनशिवे हे असून, उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज (दादा) पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे असतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गब्रिएलभाऊ तिवडे हे कार्यभार सांभाळणार आहेत.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी आपल्या लेखणीतून कामगार, शोषित, पीडित, कष्टकरी, वंचित आणि दुर्लक्षित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या शाहिरी, साहित्य आणि पोवाड्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले. अत्यल्प औपचारिक शिक्षण असूनही त्यांनी कादंबरी, कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य अशा विविध साहित्यप्रकारांत मोठे योगदान देत मराठी साहित्य समृद्ध केले.
या अभिवादन सभेत प्रमुख वक्ते नितीन चंदनशिवे हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान तसेच त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार चळवळीतील मान्यवर, विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच जय भीम क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गब्रिएलभाऊ तिवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा वनिता सकटे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रशांत आवळे, जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण वारे, मिरज तालुका कार्याध्यक्ष विनोद तांदळे, सांगली जिल्हा संघटक अजित सदामते, जिल्हा कार्याध्यक्ष विजय वायदंडे, मिरज तालुकाध्यक्ष सुनील मोरे, महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षी क्षीरसागर, सुनिता तांदळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार असून, सर्व नागरिकांनी या अभिवादन सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या