प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन विलिंग्डन महाविद्यालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
सोसायटीचे पहिले कार्यवाह आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कै. वामन शिवराम आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध घटक संस्थांमध्ये संस्थापक दिनाचे आयोजन केले जाते. यानिमित्त संस्थेतील शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कामत यांनी ‘भविष्यातील संवाद कौशल्ये’ या विषयावर विचार मांडले. डिजिटल युगात मानवी भावनांमध्येच सर्जनशीलतेची खरी क्षमता असून, त्यातून विविध संवादमाध्यमांची निर्मिती होत आहे. या संवादमाध्यमांचा समाजहितासाठी प्रभावीपणे वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात परिषदेचे सदस्य डॉ. विश्राम लोमटे यांनी ‘प्राचीन भारतातील संवाद कौशल्ये’ या विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीव सदस्य श्री. नारायण आपटे यांनी केले. कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशिष पुराणिक यांनी मानले. परिषद सदस्य श्री. अमित कुलकर्णी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कु. श्रावणी देशपांडे यांनी शारदा स्तवन सादर केले. सौ. ऐश्वर्या कुलकर्णी, सौ. रश्मी तोरो आणि डॉ. ज्योती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन घटक संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे केले.
कार्यक्रमास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व घटक संस्थांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या