सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या बदली, मानधन व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीवरून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. कायम सेवेसाठी लावण्यात आलेली ‘१० वर्षांची अट’ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी संघटनेचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
महानगरपालिकेत अनेक कामगारांनी आठ ते नऊ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. मात्र, केवळ काही महिन्यांचा कालावधी कमी पडत असल्याने त्यांना कायम सेवेतून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असून समानता व उपजीविकेच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
कोविड-१९ महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून महानगरपालिका सेवेत कार्यरत राहिलेल्या कामगारांनाही आज कायम नोकरीसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कायम सेवेत जाण्याच्या प्रतीक्षेत काही कामगारांचा मृत्यू झाला, तर काही जण सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले.
अनुसूचित जाती व बहुजन समाजातील कामगारांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित कायदे व घटनात्मक तरतुदींच्या चौकटीत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
- १० वर्षांची अट तात्काळ रद्द करून पात्र कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे.
- आठ ते नऊ वर्षे सेवा केलेल्या कामगारांना तातडीने सेवेत कायम करावे.
- सेवेत असताना मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना कायम नोकरी द्यावी.
- सेवानिवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व रोजगार उपलब्ध करून द्यावा.
- कोविड काळात सेवा बजावलेल्या कामगारांना विशेष प्राधान्य द्यावे.
आंदोलनाचा इशारा
वरील मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासह तीव्र आंदोलन, मोर्चे व उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे.
“हा लढा केवळ नोकरीचा नसून कामगारांच्या अस्तित्वाचा आणि न्याय्य हक्कांचा आहे. वर्षानुवर्षे सेवा करणाऱ्या कामगारांवर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही,” असा इशारा कांबळे यांनी दिला.
— संजय भूपाल कांबळे
जिल्हा संपर्कप्रमुख,
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या