सांगली : घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून ८ लाख ८१ हजार २९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई जत-कवठेमहांकाळ मार्गावरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल परिसरात करण्यात आली.
प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी (वय ३०, रा. डोणीपिर वस्ती, बिळूर, ता. जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिळूर येथील रावसाहेब बाबू घेज्जी यांच्या घरात २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्रशांत घेज्जी हा चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन जतहून सांगलीकडे विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी जत-कवठेमहांकाळ मार्गावरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल सानिया गार्डन परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या थांबलेल्या प्रशांत घेज्जी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याच्या चेन, झुमके, पट्टी, अंगठी, गंठण यासह अन्य सोन्याचे दागिने तसेच चांदीची अंगठी आढळून आली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने बिळूर येथील आपल्या चुलत चुलत्याच्या घरात कोणी नसताना दरवाज्याची कडी काढून प्रवेश केला आणि किचनमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीतील काही रोख रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ८ लाख ७८ हजार ७९० रुपये किमतीचे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ हजार ५०० रुपये किमतीचे ५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ८ लाख ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाखकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने केली. पथकात संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजीत जाधव, मोतीराम खोत, केरुबा चव्हाण, अभिजीत माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर यांचा समावेश होता.
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या