सांगली : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या सदस्यांनी मैत्री दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजातील एकाकी ज्येष्ठ महिलांनाही आपुलकीचा हात दिला.
कार्यक्रमात सर्व सदस्यांनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून आपल्या मैत्रीचे नाते कायम दृढ ठेवण्याचा संकल्प केला. तसेच परिसरातील एकट्या राहणाऱ्या काही ज्येष्ठ महिलांना विशेष निमंत्रण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कोणत्याही प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देत त्यांना भावनिक आधार देण्यात आला.
यावेळी ग्रुपच्या समन्वयक जया जोशी यांनी 'मैत्री' या विषयावर मनोगत व्यक्त केले. मैत्रीचे महत्त्व, परस्पर सहकार्य आणि आयुष्यातील काही संस्मरणीय अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या विचारांनी कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. रंजना साठे, जया जोशी, रोहिणी कुलकर्णी, अनिता पवार, अक्षदा यादव, योजना गाणमोठे, शैला बिजर्गी, सरिता चौगुले, कांचन पाटील, शुभांगी दामले-पाटील, माधुरी चौथाई, सबनीस यांच्यासह समाजातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे मैत्री दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. विशेषतः आमंत्रित ज्येष्ठ महिलांनी व्यक्त केलेला आनंद आणि कृतज्ञता हा कार्यक्रमाचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण ठरला. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत, समाजात स्नेह, आपुलकी आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या