प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुुपवाड महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने वाढीव घरपट्टीचा निर्णय घेतल्यापासून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात नागरिकांनी एकजुटीने उभे राहून कृती समितीच्या वतीने मंगळवारी, दि. ४ ऑगस्ट रोजी सांगली शहर बंद ठेवण्याचा आणि भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या एकजुटीने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील वातावरण तापले आहे.
महापालिकेने आंदोलनासंबंधी जाहिरात होल्डिंगवर लावण्यास बंदी घातल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे. प्रशासनाच्या फाटक्या कारभारावर कोणतीही कारवाई न करता नागरिकांच्या आवाजाला गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा अपमान असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. भ्रष्टाचार, ढिसाळ व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना प्रशासनाने फक्त आंदोलन रोखण्याचा मार्ग स्वीकारला, ही बाब नागरिकांना असह्य ठरली आहे.
वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता स्टेशन चौकातून होणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला लोकशाहीची चपराक देण्याचा निर्धार व्यक्त केला असून "तुम्ही कितीही बंदी घाला, मात्र मोर्चा यशस्वी होणारच" असा ठाम इशारा दिला आहे.
सांगली शहरात या आंदोलनामुळे वातावरण तापले असून उद्याच्या बंद व मोर्च्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या एकजुटीने प्रशासनाला कठोर संदेश देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या