प्रतिष्ठा न्यूज | अनिल शिंदे
सावळज, दि. ३ : सावळज व अंजनी (ता. तासगाव) परिसरात सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून मका, मिरची, ऊस यांसह विविध पिकांचे नुकसान होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही तासगाव तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाच्या पथकाने बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
गोगलगायी दिवसभर जमिनीत लपून बसत असल्या तरी पाऊस सुरू होताच रात्री मोठ्या संख्येने बाहेर येऊन पिकांच्या कोवळ्या पानांवर ताव मारत आहेत. त्यामुळे विशेषतः मका, मिरची व ऊस पिकांचे मोठे नुकसान होत असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाहणीदरम्यान अंजनी येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या Advanta PAC-741 मका पिकाची तसेच राजेश मारुती पाटील यांच्या मिरची व ऊस क्षेत्राची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेताच्या बांधाभोवती मृत व जिवंत गोगलगायींचा अक्षरशः खच पडलेला पाहून अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली.
दोन्ही शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या Snail Kill औषधाचा शेताच्या बांधाभोवती वापर केला होता. तसेच रात्री गोळा करून पोत्यांमध्ये भरून ठेवलेल्या गोगलगायींचीही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी गोगलगायींच्या नियंत्रणासाठी देशी व प्रभावी उपाय सुचविताना रात्री शेताच्या सभोवती गुळाचे पाणी शिंपडून त्यावर ओले बारदान (गोणपाट) अंथरण्याचा सल्ला दिला. सकाळी त्या बारदानाखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात, तसेच शेतातील बांध स्वच्छ ठेवणे, पाण्याचा योग्य निचरा करणे आणि शिफारशीनुसार नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी प्रतिकूल हवामानातही राजेश मारुती पाटील यांनी जोपासलेल्या मिरची पिकाचे तसेच दत्तात्रय पाटील यांनी प्रथमच चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या Advanta PAC-741 मका लागवड प्रयोगाचे विशेष कौतुक करत पुढील पीक व्यवस्थापनाबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान विठ्ठल पाटील मळा, अंजनी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. गोगलगायींचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक पातळीवर उपाययोजना राबविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.
सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहिल्यास गोगलगायींचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियमित शेत पाहणी करून वेळेवर नियंत्रणात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
या पाहणीवेळी तासगाव तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी आर. जे. पाटील, उपकृषी अधिकारी जे. जे. चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी आदित्य काटकर तसेच परिसरातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या