प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ब्राह्मण सभा, तासगावच्या वतीने श्री विष्णू मंदिर येथे गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी व्यास व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसही अभिवादन करण्यात आले.सांगली येथील ह.भ.प. श्री.दीपक महाराज केळकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ब्राह्मण सभा,तासगावचे उपाध्यक्ष सुनील जोशी तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष चैतन्य हंचनाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे ह.भ.प.केळकर महाराज यांच्या हस्ते ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. दीपक महाराज केळकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुंचे स्थान व मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.बदलत्या शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणत ज्ञान, कौशल्य व संस्कारांची सांगड घालावी, असे आवाहन त्यांनी केले.तसेच लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेत त्यांच्या राष्ट्र निर्माणाच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभा, तासगावचे उपाध्यक्ष सुनील जोशी यांनी केले.त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे ह.भ.प. दीपक महाराज केळकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जोशी यांनी केले,तर ब्राह्मण सभेचे सचिव अभिजीत जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.सामुदायिक पसायदान पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या गुणगौरव सोहळ्यास तासगाव तसेच परिसरातील विविध गावांमधील ब्राह्मण समाजातील बंधू-भगिनी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या