प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगावची देशभरात नावलौकिक असलेली बेदाणा बाजारपेठ शेतकरी, व्यापारी आणि विविध घटकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार व आर्थिक उलाढाल निर्माण करीत आहे. मात्र, या बाजारपेठेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे असून, विनाकारण तासगाव बेदाणा बाजारपेठेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा जोरदार पलटवार कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे सभापती युवराजदादा ऊर्फ सुनील भानुदास पाटील यांनी केला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तासगावच्या बेदाणा बाजारपेठेचा इतिहास, शेतकऱ्यांना मिळणारी बाजारपेठ आणि बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विक्री व्यवस्थेची माहिती दिली.
सन १९९४ पासून तासगावात बेदाण्याचा लिलाव पद्धतीने व्यापार सुरू झाला. स्व. आर. आर. (आबा) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष उत्पादनाची विक्री व्यवस्था लक्षात घेऊन द्राक्ष शेतमालावर प्रक्रिया होऊन तयार होणाऱ्या बेदाण्यासाठी लिलाव पद्धतीने विक्री व्यवस्था सुरू केली. सुरुवातीला बेदाणा मालाचे सौद्याचे दर व्यापारी यांच्याकडून ठरविले जात होते.त्यानंतर स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना बेदाणा उत्पादनासाठी जास्तीत जास्त व योग्य भाव मिळू लागला, असा दावा बाजार समितीने केला आहे.तासगावची बेदाणा बाजारपेठ ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाच्या बेदाणा बाजारपेठांपैकी एक असल्याचे सभापती पाटिल यांनी सांगितले. लिलाव पद्धतीने बेदाणा विक्री होत असताना सौद्याच्या वेळी मालाची सॅम्पल अनेक व्यापाऱ्यांकडून पाहिली जाते. त्यामुळे एकदा घेतलेला सॅम्पल पुन्हा त्याच बॉक्समध्ये पडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
*तुटीबाबतही बाजार समितीचा खुलासा*
सॅम्पलसाठी घेतलेल्या मालाची तूट शेतकऱ्यांच्या पदरी किती लावावी, याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली, द्राक्ष बागायतदार संघटना, शेतकरी संघटना तसेच सांगली, तासगाव, पंढरपूर व सोलापूर येथील बेदाणा खरेदी-विक्री व्यापाऱ्यांमध्ये संयुक्त बैठक घेऊन धोरण निश्चित करण्यात आले आहे.
या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या बेदाणा शेतमालाचे पेमेंट अडते यांच्याकडून २२ ते २५ दिवसांत देणे, तसेच सौद्याच्या वेळी सॅम्पल बॉक्समधून सांडलेल्या बेदाण्याची तूट फक्त ५०० ग्रॅमपर्यंत धरणे निश्चित करण्यात आले आहे. तासगाव बाजारपेठेत या धोरणाची अंमलबजावणी बाजार समितीमार्फत केली जात असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.एखाद्या शेतकऱ्याने याबाबत बाजार समितीकडे तक्रार नोंदविल्यास त्याला योग्य न्याय देऊन, व्यापाऱ्याकडून चूक झाल्यास व्याजासह शेतकऱ्याचे पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येते,असा दावा बाजार समितीने केला आहे.
‘शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे काम बाजार समिती करते’
बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास बाजार समिती त्याची दखल घेऊन योग्य न्याय देण्याचे काम करते. त्यामुळे तासगावच्या बाजारपेठेत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी आपला बेदाणा शेतमाल सौद्यामध्ये विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे त्यांनी म्हटले.तासगावची बेदाणा बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत असून, सन २०२५-२६ मध्ये बेदाणा शेतमालाची उलाढाल तब्बल २,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा सभापती पाटिल यांनी केला आहे.या बाजारपेठेमुळे तासगाव शहर व तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तासगाव तालुक्यात तसेच राज्यातील इतर भागांतील व्यापाऱ्यांनी बेदाणा व्यवसायासाठी ५३ कोल्ड स्टोरेज उभारून या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. बेदाणा व्यापारासाठी आवश्यक वॉशिंग आणि ग्रेडिंग युनिट्सही उभारण्यात आली आहेत.याशिवाय या व्यवसायाच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळाला असून, वाहतूकदार, टेम्पो व रिक्षाचालक, मोठी वाहने चालविणारे चालक, हमाल आणि दिवाणजी यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा बेदाणा साठवून वॉशिंग-ग्रेडिंग करून चांगला बाजारभाव मिळत असल्याचे बाजार समितीने म्हटले आहे.
‘बाजारपेठेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये’
दरम्यान,तासगाव बेदाणा बाजारपेठेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी विनाकारण बाजारपेठेस बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचा आरोप बाजार समितीने केला आहे.
“बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. बेदाणा तुटीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माल विक्रीनंतर काही तक्रार असल्यास ती बाजार समितीकडे सादर करावी. विनाकारण तासगाव बेदाणा बाजारपेठेस बदनाम करण्याचा किंवा बाजारपेठ मोडीत काढण्याचा कुटील प्रयत्न करू नये,” असा इशारा बाजार समितीने दिला आहे.शेतकऱ्यांच्या बेदाणा शेतमाल विक्री व्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होईल, अशी कोणतीही गोष्ट करू नये.बाजार समिती कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती आणि आजही आहे, असे सभापती युवराजदादा ऊर्फ सुनील भानुदास पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या