कोल्हापूर, दि. ४ : महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री, बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तथा पन्हाळा–बावडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे आज वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एका प्रेरणादायी पर्वाचा अस्त झाला आहे.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कार्य उभारले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचा दृढ विश्वास बाळगत त्यांनी देशभरात विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंतवैद्यकीय, कृषी तसेच विविध उच्च शिक्षण संस्था स्थापन करून लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली.
राजकीय जीवनात त्यांनी पन्हाळा–बावडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेचे नेतृत्व केले. विकासाभिमुख दृष्टी, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे त्यांनी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्था आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व हे दूरदृष्टी, कार्यतत्परता, साधेपणा आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक होते. त्यांनी उभारलेल्या संस्था, घडविलेली विद्यार्थी पिढी आणि समाजहितासाठी केलेले कार्य हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे स्मारक राहील.
त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ, माजी विद्यार्थी आणि नागरिकांकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या