सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली आणि विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या तिरंगा रॅलीमध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स तसेच विलिंग्डन महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेत तिरंग्याप्रती असलेला आदर आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद अशा देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्येही राष्ट्रप्रेमाचा संदेश पोहोचविला. तिरंगा रॅलीमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमासाठी एनसीसी अधिकारी श्री. सुनील कोपार्डे आणि श्री. सागर जांभळे यांनी विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या आयोजनामध्ये दोन्ही महाविद्यालयातील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या त्यागाची आठवण करून दिली. स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रवींद्र कुलकर्णी सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाबद्दलची जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या