सांगली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर राष्ट्रीय सेवेचे व्रत अंगीकृत व्हावे या उदात्त हेतूने भारत सरकारने राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. महाविद्यालयातील तरुणांनी राष्ट्रीय सेवा योजनेत दोन वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यास व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर नैतिक मूल्यांचे जतन होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे सब इन्स्पेक्टर मा. रितेश कुमार उपस्थित होते. या वेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा कुंभार, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. शंकर पाकले, प्रा. जयश्री हटकर, प्रा. रवींद्र काटकर, डॉ. आनंदा सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कणसे पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्व धर्म सहिष्णुता यांसारखी अनेक मूल्ये रुजली जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, नम्रता, क्षमाशीलता, जबाबदारीची जाणीव यांसारखे गुण रुजले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान हे अनुभवातून मिळालेले असते आणि ते चिरकाल टिकणारे असते.’
सब इन्स्पेक्टर रितेश कुमार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपत्कालीन परिस्थिती केव्हा आणि कशी उद्भवेल हे सांगता येत नाही. अशा वेळी आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाची नितांत गरज असते. यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो.’ या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. कृष्णा भवारी यांनी केले, कार्यक्रमाचे स्वरूप डॉ. वर्षा कुंभार यांनी स्पष्ट केले, सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जयश्री हटकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या