सांगली, दि. ३ : रोटरी क्लब ऑफ सांगली आणि सिल्वर जुबिली ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उषा मोहिनी विकलांग केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात पाच लाभार्थ्यांना जयपूर फूट आणि एका लाभार्थ्याला कॅलिपरचे वितरण करण्यात आले. गेली २६ वर्षे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना नवजीवन मिळत आहे.
या प्रकल्पासाठी जर्मनीस्थित श्री. प्रवीणकुमार हेरवाडे आणि श्री. विरेन हेरवाडे यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे गरजू दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे शक्य झाले.
कार्यक्रमात सौ. सुप्रिया हेरवाडे, ज्योती हेरवाडे, सविता तंगडी, रौनक संजय वडगावे आणि रोनीत वडगावे यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना जयपूर फूट व कॅलिपर प्रदान करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष गिरीश तंगडी, सचिव यशांक गोकानी, उदय पाटील, अशोक सावंत, रामकृष्ण चितळे, सौ. नंदाताई झाडबुके, केंद्राचे तंत्रज्ञ नंदकुमार माळी, तसेच लाभार्थी व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी रोटरी क्लब ऑफ सांगली आणि सिल्वर जुबिली ट्रस्ट यांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचे कौतुक केले. दिव्यांग बांधवांना सक्षम जीवन जगण्यासाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच सेवाकार्याचा विस्तार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या