प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत युनायटेड मुस्लिम फोरम, सांगली यांच्या वतीने महानगरपालिका अंतर्गत शाळा क्र. २५, मिरज येथील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शूज व सॉक्सचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेची भावना जागवणारा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. चिमुकल्यांना शूज व सॉक्समिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
यावेळी युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हाध्यक्ष हिदायत कादरी, सावित्री-फातिमा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साबेरा पठाण, सोहेल चौधरी व जोहेब मुल्ला यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना शूज व सॉक्स भेट देण्यात आले.
यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाविषयी उत्साहाचे वातावरण होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मन लावून अभ्यास करण्याचे आणि देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शिक्षिका सायरा शेख यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या