प्रतिष्ठा न्यूज
सांगली : कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये किरकोळ वादातून मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या दांपत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकल हिंदू समाजातर्फे सांगली आणि कुपवाड बंद पाळण्यात आला. या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सांगली महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आरोपीचा एन्काऊंटर करावा अशी मागणी केली. सांगली आणि मिरज मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात झाले. आरोपी फरीद शेख याने मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांच्यावर हातोडा व सुरीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या मोहन केसरेकर यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी त्यांचाही मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दांपत्याचा मृत्यू झाल्याने सांगली-कुपवाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी फरीद शेख याला अटक केली आहे. मात्र, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार शुक्रवारी सांगली आणि कुपवाड परिसरात बंद पाळण्यात आला. विविध भागांत नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला.
‘आरोपीला फाशी द्या’च्या घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चात सहभागी नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मोर्चादरम्यान ‘केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला फाशी झाली पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी महापालिका परिसरात एकत्र येत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
मृत दांपत्याच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आरोपी फरीद शेख याचा एन्काऊंटर करण्याची मागणी त्यांनी केली. ‘पोलिसांना एन्काऊंटर करणे शक्य नसेल तर आरोपीला जनतेच्या ताब्यात द्यावे,’ अशी उद्विग्न मागणी नातेवाईकांनी केली. आरोपीवर कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीही त्यांची मागणी होती.
जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
मोर्चेकऱ्यांनी आरोपी फरीद शेख याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी केली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच मृत मोहन व मनीषा केसरेकर यांच्या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या त्यांच्या मुलीला तसेच इतर साक्षीदारांना शासनाने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. पीडित कुटुंबाला आर्थिक आणि आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
राजकीय नेते, हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेशदादा लांडगे, आमदार संग्रामभैय्या जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, भाजप नेत्या नेता केळकर, पृथ्वीराज पवार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे नितीन चौगुले यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी झाले होते. सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांसह कर्नाटकातून आलेले नागरिकही मोर्चात सहभागी झाले.
केसरेकर दांपत्याच्या हत्येने नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप या मोर्चातून स्पष्टपणे दिसून आला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी हत्याकांडात झाल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, तसेच आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी भावना मोर्चातील नागरिकांनी व्यक्त केली.
आता या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या