मिरज प्रतिनिधी : आगामी श्रीगणेशोत्सव २०२६ उत्साहात, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा, यासाठी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मिरज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (२१ ऑगस्ट) बालगंधर्व नाट्यगृह येथे महापौर धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक तसेच मिरज शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच नागरिकांच्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावरील कमानी, विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्याची दखल घेत संबंधित मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. तसेच मिरवणूक मार्गावर स्टॉलमुळे होणाऱ्या वाहतूक आणि मिरवणुकीच्या अडचणींवरही उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेश तलाव परिसरातील विसर्जन व्यवस्थेवर विशेष लक्ष
गणेश तलाव व घाट परिसरात भाविकांना ये-जा करण्यासाठी मार्ग सुलभ करणे, आवश्यकतेनुसार बोट व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष क्रेनची व्यवस्था करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. विसर्जन काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मिरज शहरातील ज्या भागात रस्त्यांच्या तक्रारी आहेत, त्या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार खड्डे बुजविणे व मुरुमीकरणाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. मिरवणूक मार्गावरील ओव्हरहेड विद्युत तारांची पाहणी करून आवश्यक ती सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी विद्युत विभागावर सोपविण्यात आली आहे.
मंडप परवानग्यांसाठी सुलभ प्रक्रिया
गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सुलभ प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिसांच्या परवानगीसाठीही प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. मात्र, कोणत्याही मंडळाने परवानगीशिवाय मंडप उभारू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उत्सव काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णालये व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मार्गावर महिला व पुरुषांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे व मुतारीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनंतरच्या दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
मिरज विभागातील सर्व सहायक आयुक्तांनी नियमितपणे फिरती करून बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची पाहणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचा पुढाकार
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे. पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे महापालिकेच्या कृत्रिम विसर्जन स्थळी किंवा शेततळ्यात विसर्जन करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या समितीमार्फत सहकार्य करण्यात येणार आहे. नदी, विहीर व तलावांमध्ये निर्माल्य विसर्जित होऊ नये, यासाठी जलस्रोतांच्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती सजावट तसेच शैक्षणिक संस्थांच्या सजावटीसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० रुपये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या सर्वोत्तम देखाव्यासाठी व सजावटीसाठी अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
‘समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्या’
महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मिरज शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव खेळीमेळीच्या, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे तसेच फलक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे सकारात्मक संदेश द्यावेत, असे त्यांनी सांगितले.
मिरज शहरातील गणेशोत्सव धार्मिक व सामाजिक सलोखा कायम राखत यशस्वी करण्यासाठी सर्व गणेश मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या