प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तालुक्यातील शेतकऱ्यांना समन्यायी पाणी वाटपाचा हक्क कधी मिळणार? यासाठी तासगावकरांनी आता ठोस भूमिका घेऊन पाणी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी केले.श्रमिक मुक्ती दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल व मेंढपाळ आर्मी यांच्या वतीने क्रांतिवीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिसिंह नाना पाटील यांची संयुक्त जयंती तासगाव येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.नुतन परिट यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.यावेळी प्रा.वासुदेव गुरव, अर्जुन थोरात, भरत थोरात, सुधीर नलवडे, अमर खोत व अॅड. कृष्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.पाणी चळवळ व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. भारत पाटणकर यांना नुकताच कोल्हापूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार, तसेच पुरंदर येथे पाणी पंचायतीचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल तासगावकरांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात डॉ. पाटणकर म्हणाले, दुष्काळी भागात पाण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे फळबागा फुलल्या आणि रोजगारासाठी शहरांकडे जाणारा तरुणांचा लोंढा काही प्रमाणात थांबला. हे यश पाणी चळवळीचे आहे. दुष्काळी तालुक्यांनी समन्यायी पाणी वाटपासाठी आपला वाटा उचलला; तासगाव तालुक्यानेही आता आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.‘माणूस केवळ पाणी पिऊन जगू शकत नाही; पाण्यासोबत शेतातून अन्नधान्य व इतर पिकेही मिळाली पाहिजेत.त्यामुळे तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना रुजविण्यासाठी काम करा. तुम्ही हे काम केले, तर तोच माझा खरा सत्कार असेल,’ असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या