प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या प्रस्तावित भूसंपादनामुळे शहरालगतची घरे, बिनशेती व गुंठेवारी प्लॉट, व्यावसायिक दुकाने, शेती तसेच शेतातील विहिरी-बोअर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने बाधित नागरिकांनी बुधवारी आमदार रोहित पाटील यांची भेट घेतली.महामार्गासाठी प्रसिद्ध झालेली भारतीय राजपत्र अधिसूचना रद्द करून महामार्गाची अलाइनमेंट शहरापासून दोन ते तीन किलोमीटर दूर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांनी आमदारांकडे केली.प्रस्तावित महामार्गामुळे शहरालगतची मोठी नागरी वस्ती बाधित होऊन अनेक कुटुंबे विस्थापित होण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विकासाच्या नावाखाली नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत,अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.यावेळी आमदार रोहित पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाची प्रस्तावित रुंदी पूर्वी 60 मीटर होती. ती 45 मीटर करण्यासाठी प्रयत्न करून महामार्गाच्या कक्षेत येणारी अनेक घरे वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र शहरालगतची नागरी वस्ती, शेती, प्लॉट आणि व्यवसायांचे नुकसान पूर्णपणे टाळण्यासाठी महामार्गाची अलाइनमेंटच शहरापासून दूर नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग बाधित नागरिकांचे शिष्टमंडळ यांची मुंबई अथवा दिल्ली येथे संयुक्त बैठक घेण्याबाबत चर्चा झाली असून, लवकरच ही बैठक घेण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने आमदार म्हणून आपल्या अधिकारांना काही मर्यादा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय महामार्ग हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या नियोजनाचा भाग असल्याने न्यायालयीन लढाईतही देशहिताचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो,याची जाणीव त्यांनी नागरिकांना करून दिली.शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी महामार्ग हवा; मात्र त्यासाठी शहरालगतची घरे, व्यवसाय आणि नागरी वस्ती उद्ध्वस्त होऊ नये.महामार्गाची अलाइनमेंट शहरापासून थोडी दूर नेऊन नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करू,असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, पुढील लढाई केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यातील अडचणी आणि संभाव्य धोकेही नागरिकांना समजावून सांगण्यात आले.या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 मुळे बाधित होणारे शेकडो नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या