प्रतिष्ठा न्यूज
विटा, प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी विटा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत २१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. या मोर्चात तीनही तालुक्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर सरकारने संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता आंदोलन अधिक आक्रमक करण्याची वेळ आली असून, २१ ऑगस्टच्या सांगली मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पलूस-कडेगाव-खानापूर शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी सांगितले की, तीनही तालुक्यांतील प्रत्येक गावातील संघर्ष समितीचे पदाधिकारी आंदोलनात सक्रिय आहेत. मागील चार महिन्यांपासून विविध माध्यमातून शक्तिपीठ महामार्गाला विरोध नोंदविण्यात आला आहे. तीनही तालुक्यांत मोठे मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली असून, आता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा निर्णायक आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी, बैलगाड्या, शेळ्या-मेंढ्या आणि जनावरांसह मोठ्या संख्येने सांगलीत धडक देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कडेगाव तालुक्याचे निमंत्रक प्रा श्रीदास होनमाने व सुवर्णा शिंदे यांनी शेतकरी आता रस्त्यावर उतरला असून ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली असल्याचे सांगितले. कडेगाव तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार श्री दास होनमाने व सुवर्णा शिंदे व्यक्त केला.
खानापूर तालुक्यातील संभाजी निकम, शीला सूर्यवंशी व दिलीप जगताप यांनी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी होतील, असे सांगितले.
पलूस तालुक्यातील किरण चव्हाण व रूपाली कोळेकर यांनी सांगली मोर्चाच्या नियोजनासाठी तीनही तालुक्यांमध्ये गावनिहाय बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करतील, असे सांगितले. तर विटा काँग्रेसचे नेते गजानन सुतार यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
पत्रकार परिषदेस संभाजी मोरे, कुंभारगावचे शेतकरी संभाजी जाधव, दिलीप नालगे, बापूराव आडके, नागेवाडी चे मनोज निकम, अक्षय सूर्यवंशी, घनश्याम निकम, भाग्यनगर चे संताजी जगताप, सुयेश जगताप, अतुल काटकर, नवरीचे विद्याधर महाडिक, अमोल महाडिक, धनाजी महाडिक, संपत महाडिक, शंकर मेटकरी, किरण कांबळे, बजरंग सकट, दत्ता ढवळे, वडीयेरायबागचे संदीप भगत, अप्पासो भगत, हैबतराव जगताप, महादेव भगत, भाळवणी व शेळकबाव येथील प्रभावती सूर्यवंशी, अमोल धनवडे, गोविंद धनवडे, धनाजी धनवडे, युवराज धनवडे, कुंडल देतील पी. एस. बापू चव्हाण, विशाल कोंढाळकर, सौरभ हेगडे, घोगाव चे पंडित कोळेकर,रुपाली कोळेकर शकुंतला गोरे यांच्यासह तीनही तालुक्यांतील विविध गावांचे शेतकरी व संघर्ष समितीचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
२१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर होणारा मोर्चा मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी करून यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या