सांगली : भारताचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग स्नूकरपटू व सांगलीचा सुपुत्र शयन शेखर शेट्टी याने चीनमधील शांघाय येथे झालेल्या शांघाय मास्टर्स वर्ल्ड स्नूकर स्पर्धा २०२६ मध्ये सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक पटकावत इतिहास रचला आहे.
२४ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी चायना बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन (CBSA) आणि वर्ल्ड डिसॅबिलिटी बिलियर्ड्स अँड स्नूकर (WDBS) यांनी शयनला विशेष निमंत्रण दिले होते. स्पर्धेत १८ देशांतील ४८ अव्वल खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये भारतातून सहभागी होणारा शायन हा एकमेव खेळाडू होता. त्याच्या प्रवासाचा व निवासाचा संपूर्ण खर्च WDBS आणि शांघाय बिलियर्ड्स असोसिएशनने उचलला.
स्पर्धेत शयनने माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल (वर्ल्ड नं. १) खेळाडूचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत त्याने रौप्यपदक पटकावले आणि सलग तिसऱ्या वेळेस जागतिक स्पर्धेत सिल्व्हर जिंकण्याचा मान मिळवला.
यापूर्वी जून २०२६ मध्ये थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड डिसॅबिलिटी स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये शयनने कांस्यपदक जिंकून देशाची मान उंचावली होती. तसेच वर्ल्ड डिसॅबिलिटी स्नूकरसाठी भारताचा अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही त्याची नियुक्ती करण्यात आली असून, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.
आता शयनचे लक्ष्य १६ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान फिनलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड अबिलिटी स्पोर्ट्स स्पर्धेवर आहे. ऑलिम्पिकच्या तोडीची मानली जाणारी ही स्पर्धा जिंकून सुवर्णपदक भारताच्या नावावर करण्याचा त्याचा निर्धार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या