प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या मालाची कथितपणे मोठ्या प्रमाणावर उधळण होत असून, त्यातून बेदाणा उत्पादकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकाराला आळा घालून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मनसे नेते अमोल काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनामुळे तासगावच्या बेदाणा सौद्याच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अमोल काळे यांच्या म्हणण्यानुसार, सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बेदाणा सौद्यात सुमारे २,५०० कलमांचा सौदा झाला. प्रत्येक कलमातून सरासरी दोन किलो बेदाणा खाली सांडल्यास एका दिवसाच्या सौद्यात तब्बल ५ हजार किलो बेदाणा उधळला जातो, असा दावा करण्यात आला आहे.महिन्यात सुमारे १३ सौदे आणि दिवाळीची सुट्टी वगळता वर्षाला सुमारे १४३ सौदे होत असल्याचे गृहीत धरल्यास, वर्षभरात तब्बल ७ लाख १५ हजार किलो बेदाणा खाली सांडला जातो, असा दावा करण्यात आला आहे. सरासरी २५० रुपये किलो बाजारभाव गृहीत धरल्यास या कथित उधळणीची किंमत तब्बल १७ कोटी ८७ लाख ५० हजार रुपये, म्हणजेच जवळपास १८ कोटी रुपये होते, असा दावा करण्यात आला आहे.
‘उधळला बेदाणा,लुटला शेतकरी!’
बेदाणा सौद्यातील या कथित उधळणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, असा सवाल मनसे नेते अमोल काळे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही या प्रकाराबाबत बाजार समिती प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.
याशिवाय अंडर बिलिंगच्या नावाखाली बेदाणा खरेदी, बॉक्समधील वजनकपात आणि शेतकऱ्यांना लवकर पैसे देण्याच्या नावाखाली ‘वटाव’ म्हणून दोन टक्के रक्कम कपात केली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकारातून शासनाचा करही बुडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
*अमोल काळे यांच्या प्रमुख मागण्या*
प्रत्येक बॉक्समधून विनाकारण दोन ते तीन किलो बेदाणा उधळण्याची पद्धत तात्काळ बंद करावी. बॉक्समधून खाली पडलेला बेदाणा अडते-व्यापाऱ्यांनी स्वतःकडे न ठेवता संबंधित शेतकऱ्याला परत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.बाजार समितीने निश्चित केलेल्या १५ किलो वजनाच्या बॉक्समध्ये होणारी अनावश्यक वजनकपात थांबवून, प्रति बॉक्स १०० ग्रॅम तुट ग्राह्य धरून शेतकऱ्यांना १४ किलो ९०० ग्रॅमप्रमाणे हिशोब देण्याचे निर्देश अडत्यांना द्यावेत, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांना देय रक्कम वेळेत अदा करावी आणि लवकर पैसे देण्याच्या नावाखाली केली जाणारी दोन टक्के कपात बंद करावी. बेदाणा सौद्यातील सर्व व्यवहार पारदर्शक करण्यासाठी सीसीटीव्ही, नियमित तपासणी आणि कडक अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी, अडते व संबंधितांवर बाजार समिती अधिनियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
*दक्षता पथक नेमण्याची मागणी*
शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीने स्वतंत्र विशेष दक्षता पथक नेमून बेदाणा सौद्याची सातत्याने तपासणी करावी, अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन बेदाणा सौद्यातील कथित गैरप्रकारांना आळा घालावा आणि उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, बेदाणा उधळण, वजनकपात, दोन टक्के कपात आणि अंडर बिलिंगबाबत करण्यात आलेल्या आरोपांची बाजार समिती प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. मनसे नेते अमोल काळे यांच्या आमरण उपोषणामुळे हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून, बाजार समिती प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे बेदाणा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या