प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भैरववाडी ते आरवडे-भिवघाट या सुमारे चार किलोमीटर महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण डांबरी करणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत भैरववाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.भैरववाडी ते आरवडे-भिवघाट हा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.मात्र, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही भागाचे डांबरीकरण झाले असले तरी उर्वरित भागाचे काम अद्याप अपूर्ण आहे.
*पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट*
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे वाहनधारक,शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पाण्याखाली खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शेतमाल वाहतुकीलाही या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे.
रस्त्याची दुरवस्था स्पष्टपणे दिसत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रशासनाच्या दारात वारंवार मांडूनही दुर्लक्षच होत राहणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजविणे,रस्त्याचे मजबुतीकरण करणे तसेच उर्वरित अपूर्ण डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
*निवेदनावर केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे!*
भैरववाडी-आरवडे-भिवघाट रस्त्याची तातडीने पाहणी करून काम सुरू न केल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निधी व आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या