प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महानगरपालिका शाळा क्र. ३६, सांगली येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त ‘सैनिकांसाठी राखी’ हा अभिनव उपक्रम उत्साहात घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच हस्तकला, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सामाजिक कौशल्यांना वाव मिळाला.
‘आनंददायी शनिवार’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक व कलात्मक विकास साधला जातो. खेळीमेळीच्या वातावरणातून शिक्षण, विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून संस्कृतीची जोपासना, राष्ट्रीय एकात्मता, हस्तकला, नवनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक केली जाते.
या उपक्रमासाठी जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या जया जोशी, वैशाली कुलकर्णी, आशा पाटील आणि अक्षता यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शंकर ढेरे तसेच शिक्षिका शाहीन सनदी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले आणि रोहिणी रेणके यांनी विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या