सांगली प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा मंगळवार, दि. 18 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती पलूस-कडेगाव-खानापूर संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड आणि श्रीदास होणमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रविराज साबळे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार विश्वजीत कदम, किरण तात्या लाड, बी. जी. काका पाटील, कॉ. धनाजी गुरव, कॉ. उमेश देशमुख, के. के. पाटील, कॉ. गिरीश फोंडे यांच्यासह शेतकरी चळवळीतील विविध नेते सहभागी होणार असून, हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात उपस्थित राहतील, अशी माहिती ॲड. दीपक लाड यांनी दिली.
यावेळी बोलताना ॲड. दीपक लाड म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बाधित गावांमध्ये जनजागृतीचे व्यापक आंदोलन उभारण्यात आले आहे. तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांवर धडक मोर्चे, शक्तिपीठविरोधी शेतकरी मेळावे, ड्रोनद्वारे सुरू असलेल्या मोजणीला तीव्र विरोध, अधिसूचनेची होळी, तसेच नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रा अशा विविध लोकशाही मार्गांनी सातत्याने आंदोलन करण्यात आले आहे.
दि. 18 ऑगस्ट रोजी होणारा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा ऐतिहासिक ठरेल. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून, त्यांच्या एकजुटीमुळे शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले जाईल, असा विश्वासही ॲड. दीपक लाड यांनी व्यक्त केला.
संघर्ष समितीचे श्रीदास होणमाने यांनी सांगितले की, या मोर्चात अनेक शेतकरी शेळ्या, मेंढ्या, जनावरे आणि बैलगाड्यांसह सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये बैठका सुरू असून, मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आणि जनजागृतीचे काम सुरू असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या