तासगाव:धावपळीची बदललेली जीवनशैली,आहारातील अनियमितता,सकस व योग्य आहाराचा अभाव तसेच व्यायामाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे हृदयरोग, मधुमेह, दमा आणि विविध श्वसनविकारांसह अनेक आरोग्य समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या ही समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल मडके यांनी केले.निमणी (ता. तासगाव) येथे स्व. लक्ष्मण पाटील (तात्या) व स्व. संभाजी पाटील (भाऊ) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त डॉ. सुधाकर पाटील व परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निमणीतील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. अनिल मडके बोलत होते.यावेळी पुढे बोलताना डॉ. मडके यांनी आरोग्याबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित केली. आजच्या आधुनिक जीवनशैलीत कामाचा ताण, अपुरी झोप, फास्ट फूड व अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमध्येही विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आहार, व्यायाम आणि आरोग्याची काळजी यांना महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत माजी उपसरपंच आर. डी. पाटील यांनी केले. निवृत्त शिक्षक मारुती गुरव, तासगाव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी निमणी गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
आदर्श माता म्हणून श्रीमती मुक्ताबाई भगवान कदम, आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. रुक्सार निसार आत्तार, आदर्श विद्यार्थी म्हणून कु. तेजस राजेंद्र काळीबाग, आदर्श दिव्यांग युवक म्हणून सचिन माणिक लुगडे, आदर्श महिला शेतकरी म्हणून सौ. प्रियांका नितीन पवार आणि आदर्श महिला व्यावसायिक म्हणून सौ. भाग्यश्री अजित गायकवाड यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केवळ स्मरणरंजन न करता समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी श्रीमती मंगल संभाजी पाटील, श्रीमती यशोदा लक्ष्मण पाटील, डॉ. सरला सुधाकर पाटील, तासगाव येथील पाटील कुटुंबीय, निमणीच्या सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके, सदस्य नामदेव जमदाडे, एस. ए. पाटील, शरद पाटील, चंद्रकांत पाटील, विलास कदम, आर. आर. पाटील, शिवाजीराव शिंदे, आण्णासाहेब चौगुले, दीपक गवळी, पी. डी. गुरव, ए. जे. सूर्यवंशी, गजानन पाटील, आप्पासाहेब पाटील, सतीश पाटील, उदय पाटील, अजित गायकवाड, गणपती पाटील, विजय पाटील, शिवाजी जाधव, सुधीर पाटील, खंडू चौगुले, माणिक लुगडे, पवन पाटील, अनिकेत देवकुळे, सौ. मनिषा पवार, सौ. अंकिता मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. सुधाकर पाटील यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या