प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण पिढी वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, सक्षम आणि सर्वगुणसंपन्न तरुणाई घडविण्यासाठी ग्रंथालयातील वाचन हीच खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कृष्णा पाटील यांनी केले.पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे आयोजित 'एक तास ग्रंथालयात' या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश एस. पाटील होते.यावेळी बोलताना ॲड.कृष्णा पाटील म्हणाले, "पुस्तक माणसाचे मस्तक घडवते आणि घडलेले मस्तक कधीच कोणाचे हस्तक होत नाही." यशाकडे नेणारी पहिली पायरी म्हणजे ग्रंथालय असून पदवी महाविद्यालय देते, मात्र विचारांची आणि बौद्धिक संपन्नतेची जडणघडण ग्रंथालयातच होते,असे त्यांनी सांगितले.मोबाईलच्या अतिरेकामुळे भाषेवर आणि विचारशक्तीवर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, भाषा माणसात सर्जनशीलता निर्माण करते. मात्र मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विचार करण्याची आणि घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्थ लावण्याची क्षमता कमी होत चालली आहे. सक्षम राष्ट्र उभारायचे असेल तर वाचन संस्कृतीचा विकास अपरिहार्य असून विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुरेश एस. पाटील यांनी सांगितले की, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड कमी होत आहे. विचारांना चालना देणारे आणि व्यक्तिमत्त्व घडविणारे माध्यम म्हणजे पुस्तक.विद्यार्थ्यांनी रिकामा वेळ मोबाईलवर न घालवता ग्रंथालयात जाऊन दर्जेदार साहित्याचे वाचन करावे.वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, पण चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावाव्या लागतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. साईनाथ घोगरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.जी.आर. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अमोल सोनवले यांनी केले.यावेळी डॉ. जीवन घोडके, डॉ. निशाराणी देसाई, डॉ. शहाजी पाटील, डॉ. कुलदीप पाटील, डॉ. श्रुती परचुरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
'एक तास ग्रंथालयात' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढून ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या