प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील ढवळी येथे अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने लावलेले लोखंडी गेटचे कुलूपच तोडून येरळा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे वाळूमाफियांचे धाडस पुन्हा एकदा उघड झाले असून, संबंधित तिघांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ढवळी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून येरळा नदीपात्रात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी २२ जुलै रोजी ग्रामपंचायतीने लोखंडी गेटला कुलूप लावून मार्ग बंद केला होता. मात्र, २५ जुलैच्या मध्यरात्री अज्ञातपणे गेटचे कुलूप तोडण्यात आले आणि पुन्हा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात अभिजित संजय लोहार (रा. ढवळी), अक्षय संजय लोहार (रा. ढवळी) आणि सौरभ सुनील चव्हाण (रा. तुरची, ता. तासगाव) यांनी गेटचे कुलूप तोडून वाळूची अवैध वाहतूक केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. संबंधितांवर वाळू चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.हे निवेदन सरपंच प्रकाश किसन पाटील यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य ओंकार पाटील, आनंदराव पाटील, व्यंकटेश वाघमारे, विष्णू काळे, सौ. सुरेखा काळे, पल्लवी काळे, सुनिता पाटील, शांता पाटील, दीक्षा माने आणि कल्पना खुडे यांच्या स्वाक्षऱ्याही निवेदनावर आहेत.
येरळा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाच्या वाढत्या प्रकारामुळे पर्यावरणासह महसूल विभागालाही मोठा फटका बसत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक स्तरावर दिला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या