सांगली, दि. २६ : आषाढी एकादशीच्या पावन आणि भक्तिमय वातावरणात माधवनगर येथील निवारा ज्येष्ठ सेवा आश्रम भक्तिरसाने न्हाऊन निघाला. संस्कार भारती, सांगली जिल्हा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष भक्तिसंध्या कार्यक्रमात अभंग, भक्तीगीते आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण आश्रम परिसर भक्तिमय झाला. सुरेल सादरीकरणामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिक भावविभोर झाले आणि अनेकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येयगीताच्या सामुदायिक गायनाने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांसह विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कलाकारांच्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात भक्तिभाव जागृत झाला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही टाळ्या वाजवत अभंगांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या भक्तिसंध्येचे आयोजन व मार्गदर्शन सौ. अंजली कुलकर्णी यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गाने अत्यंत दर्जेदार आणि भावस्पर्शी सादरीकरण करून कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. सूत्रसंचालन संस्कार भारतीच्या सचिव सौ. कविता कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी संस्कार भारती सांगली जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद महाबळ, जिल्हा संयोजक श्री. विसुभाऊ कुलकर्णी, निवारा ज्येष्ठ सेवा आश्रमाचे विश्वस्त श्री. माधव वैशंपायन तसेच आश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भक्तिसंध्येत दुर्गेशनंदिनी साठये, अर्चना साळुंखे, सुजाता खाडीलकर, शरयू कुलकर्णी, निलीमा रेड्डीयार, पूजा कबाडे, तेजस्विनी वाटवे, संगीता पाटील, लीना खोत, वर्षा कळेकर, अनोश मोरे, कविता कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांनी आपल्या मधुर स्वरांनी अभंग व भक्तीगीतांचे सादरीकरण केले. तबल्यावर शशांक गोसावी यांनी तर संवादिनीवर कल्याणी जामदार यांनी उत्कृष्ट साथसंगत करत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी निवारा ज्येष्ठ सेवा आश्रमाच्या वतीने सौ. वंदना ओगले यांनी संस्कार भारतीच्या सर्व कलाकारांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांना आनंद, मानसिक समाधान आणि नवचैतन्य मिळते, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिसंध्येमुळे निवारा ज्येष्ठ सेवा आश्रमात विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला. संगीत, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या