सांगली, दि. २६ : महाराष्ट्र शाहिर परिषद आणि शाहिरी कला व लोककलावंत विकास परिषद, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीशाहिर कै. ग. द. दिक्षित यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त गावभागातील क्रांतीशाहिर दिक्षित चौक येथे शाहिरी मानवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी पांचूदे आणि बबनराव क्षीरसागर यांच्या हस्ते क्रांतीशाहिर दिक्षित यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी क्रांतीशाहिर दिक्षित यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शाहिरी परंपरेच्या जतनासाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर उपस्थित शाहिरांनी आपल्या दमदार शाहिरी सादरीकरणातून क्रांतीशाहिरांना भावपूर्ण मानवंदना अर्पण केली. पोवाडे, लोकगीते आणि शाहिरी रचनांमधून सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या कै. ग. द. दिक्षित यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर बजरंग आंबी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाहीर अनंतकुमार साळुंखे यांनी केले.
यावेळी शाहीर रामचंद्र जाधव, मोहन यादव, अवधूत विभुते, संभाजी मेंढे, अंकुश मिसाळ, दादासाहेब जाधव यांच्यासह अनेक शाहिर, लोककलावंत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून क्रांतीशाहिर कै. ग. द. दिक्षित यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याला अभिवादन करत शाहिरी परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या