प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:विटा ते मिरज या महत्त्वाच्या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे.मनसेच्या अमोल काळे आणि पदाधिकाऱ्यांनी विटा-मिरज रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील खड्ड्यांची गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली.यावेळी खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून रस्त्याची वस्तुस्थिती समोर आणण्यात आली.विटा-मिरज रस्त्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
“खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना जाब विचारू”
रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी दिला.नागरिकांच्या जीविताशी आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाने वेळकाढूपणा करू नये. जनतेला सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा अधिकार असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी मनसेने केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या