प्रतिष्ठा न्यूज
मालगाव : मालगाव येथील प्रसिद्ध बावाफन दर्ग्याचा उरूस सोमवार पासून सुरू झालेला उरूस शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांच्या वतीने मालगाव येथे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच पोलिसांचा संयुक्त रूट मार्च काढण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
बावाफन दर्ग्यासमोर दंगल नियंत्रण पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी तीन अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून प्रात्यक्षिक करण्यात आले. उरूस काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून ही पूर्वतयारी करण्यात आली.
या संयुक्त रूट मार्चमध्ये चार पोलीस अधिकारी, २६ पोलीस अंमलदार, आरसीपी पथकातील एक अधिकारी व १३ अंमलदार सहभागी झाले होते. तसेच तीन मोठी वाहने आणि चार मोटारसायकलींचा ताफ्यात समावेश होता.
उरूस शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या