प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : समरसता साहित्य परिषद, सांगली जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भारतीय सण, परंपरा व आपल्या महामानवांच्या प्रति आदर निर्माण व्हावा, त्याचे ज्ञान व्हावे , कार्याची माहिती व्हावी म्हणून मासिक उपक्रम आयोजित केले जातात. रविवार दि. २९ रोजी गुरुपौर्णिमेनिमित गुरुपौर्णिमेची माहिती व्हावी. भारतीय परंपरेतील गुरु- शिष्य परंपरेची माहिती होऊन गुरूंचे महत्व ज्ञात होऊन गुरूंप्रति आदर वृद्धिंगत व्हावा म्हणून
गुरु-शिष्य परंपरेचा जागर करण्यात येऊन गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा उपक्रम मनपा शाळा नं.१५ मध्ये घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आनंदहरी, शाळेचे मुख्याध्यापक नितीन रसाळ, सह शिक्षिका सौ. गीता मुधोळकर, समरसता साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ कवी विनायक कुलकर्णी, कार्यवाह कविवर्य आनंदराव जाधव, कार्यकारिणी सदस्या कवयित्री सौ.अस्मिता इनामदार आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक नितीन रसाळ यांनी स्वागत केल्यानंतर समरसताचे जिल्हाध्यक्ष विनायक कुलकणी यांनी समरसता च्या उपक्रम, भारतीय परंपरा, २३ ऑगस्ट हा लो.टिळक जयंती दिन असल्याने त्यांच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आनंदहरी यांनी जीवनातील गुरूंचे महत्व, भारतीय गुरुपरंपरा, तसेच संत गुरुपरंपरा याबद्दल गोष्टीरुप माहिती सांगितली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी नितीन रसाळ यांनी लिहिलेल्या प्रार्थना गीतावर नृत्यकला सादर केली. समरसता साहित्य परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना छोटासा खाऊ वाटप झाल्यानंतर समरसताचे कार्यवाह आनंदराव जाधव यांनी आभार मानले. समरसता च्या सहकार्यवाह संजीवनी कुलकर्णी, सदस्या अस्मिता इनामदार, शाळेच्या सहशिक्षिका गीता मुधोळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या