प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पदोन्नतीबाबत नागपूर खंडपीठाचे निवाड्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी शासन सकारात्मक असून पदोन्नतीच्या दिवसांपर्यंत TET उत्तीर्ण शिक्षकांना संधी दिली जाईल असा शासनाचा प्रस्ताव आहे.
संघटनांनी कोल्हापूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत TET ची अट घालून पदोन्नती करावी असा आग्रह धरला असता सदर निर्णय व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका बैठकीत शासनाने घेतल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले .
BLO कामे आणि सध्या सुरू असलेली कारवाई व FIR बाबत महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे पुढील सप्ताहात बैठक घेऊन त्यांचेकडून शिक्षकांना पुढे BLO मधून वगळणे आणि कारवाई रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे शिक्षणमंत्री महोदयांनी सांगितले.
संचमान्यता प्रकरणी शिक्षण विभाग नवीन प्रस्ताव तयार करत असून त्याबाबत शिक्षणानुकुल यथोचित निर्णय घेतला जाईल.सर्व विषय पदवीधर शिक्षकांचे वेतनश्रेणी संबंधाने अनुकूल प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचे मंजुरीपश्चातच निर्णय होईल असे प्रधान सचिव शालेय शिक्षण रणजितसिंह देओल यांनी सांगितल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले .
पवित्र पोर्टलने भरती होण्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबविणेसंबंधाने शिक्षण विभागाने सकारात्मकता दर्शविली असून याबाबतची कार्यवाही ग्राम विकास विभागाने करायची असल्याने त्यांचे सोबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे मंत्रीमहोदयांनी सांगितले.
९ जुलै च्या रजा आंदोलनाच्या वेतन कपातीबाबत मुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.शिक्षण सेवक सेवा कालावधी, माध्यमिकचे टप्पा अनुदान याबाबत शासन लवकरच बैठक घेऊन निर्णय घेईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.
शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केशवराव जाधव,मध्यवर्तीचे श्री. राजेश सुर्वे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे सहभागी झाले होते.
आमदार सुधाकर अडबाले,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रम काळे यांचेसह राज्य शिक्षण आयुक्त मा. सचिन्द्र प्रताप सिंग,प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर , शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे, ग्राम विकास विभागाच्या उपसचिव, SCERT चे सहसंचालक मा. पानझडे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या