सावळज प्रतिनिधी : दि. 30 :तासगाव तालुक्यात 69 गावे आहेत.परंतु पोलीस ठाणे मात्र तासगाव येथे एकच आहे.त्यामुळे तालुक्यात कायदा-सुव्यस्था अबाधित ठेवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.
सावळज गावात पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थानासाठी 20 गुंठे राखीव जागा मंजूर असून सुध्दा शासनाच्या नाकर्तेपणा मुळे त्याठिकाणी नवीन पोलीस ठाणे मंजुर होऊ शकले नाही.
सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे व तासगाव पोलीस ठाण्यावरील अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार व शिवसेना माजी तासगाव तालुका प्रमुख अनिल (भाऊ) शिंदे यांच्या माध्यमातून प्रदीर्घ कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत याच अनुषंगाने आज सावळज येथे दलित पँथर सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत (भाऊ) केदार व शिवसेनेचे मा. तासगाव तालुका प्रमुख अनिल (भाऊ) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे की, राज्य शासनाने नवीन पोलीस ठाणे निर्मिती संदर्भात 25 ऑगस्ट 2023 रोजी नवीन अध्यादेश जारी केला आहे.या नवीन अध्यादेशातील अटी व शर्तींचा विचार करता सावळज येथे स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे उभा राहू शकते.
सावळज येथे पोलीस दुरक्षेत्र आहे.या दुरक्षेत्रांतर्गत 20 गावे येतात.सावळज पूर्व भागातील गावात कोणत्याही गावात गुन्हा घडल्यास तासगाव येथे यावे लागते.परिणामी दूरच्या अंतरावरून येताना नागरिकांचा वेळ,पैसा व हेलपाटे वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. तसेच एका पोलीस ठाण्यातील तुटपुंजे कर्मचारी व तुलनेने वाढलेली गुन्हेगारीमुळे तसेच गुन्ह्यांची निर्गती रखडत आहे.
सन 2015 मध्ये तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्री.कृष्णात पिंगळे यांनी सावळजसाठी नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविला होता. परंतु त्यावेळी मागील तीन वर्षातील गुन्ह्यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. परंतु आज रोजी नवीन पोलीस ठाणे मंजूरी अध्यादेशातील नियम व अटीत सावळज पोलीस ठाणे बसते आहे. पूर्व भागातील वाढलेले गंभीर गुन्हे पाहता सावळज पोलीस ठाणे मंजूर करणे काळाची गरज बनली आहे.
सावळज पोलीस ठाणे मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह पोलीस महासंचालक यांचेकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठविण्यात आला.तेंव्हा तासगाव पोलीस ठाण्यावरील ताण कमी करणे व पूर्व भागातील नागरीकांना सोयीच्या दृष्टीने तासगाव पोलीस ठाण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी द्यावी. सावळज पोलीस ठाणेचा प्रलंबित प्रश्न दुर्लक्षित झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यासमोर 15 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा निवेदनात प्रशांत केदार,अनिल शिंदे,तमा दोडमणी यांनी दिला आहे.आंदोलनावेळी युवती राज्यध्यक्षा प्रमिला गावडे,मातंग सेवा संघाचे तमा दोडमणी,अजय चव्हाण,सोनू हंकारे,निखिल देवकुळे,कांता शिंदे,निकिता केदार,संजय देवकुळे,शुभम केंगार,प्रकाश गुजले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या